Tuesday, 13 September 2011

कितीतरी ऋतू आले , कितीतरी ऋतू गेले

कितीतरी ऋतू आले , कितीतरी ऋतू गेले .
नवनवीन शोध लागले , 
नवनवीन पाखरं आली , अन वस्ती करूनही गेली .
परी मी तेथेच राहले ,
जेथे सख्या तू मला येण्याचे वचन दिले .

भर शृंगार केलेला मी ,
नव वधूचा साज चढविला मी ,
तुझी वाट बघता बघता सारा शृंगार अश्रूत वाहून गेला ,
सजाचे मी करणार काय , तोही उतरवून ठेवला ,
कुणी मज नाव ठेविले , कुणी केविलवाणे बोलले ,
तरीही मी तेथेच राहले ,
जेथे सख्या तू मला येण्याचे वचन दिले .

शरीर थकले परी मनाला मरगळ आली नाही ,
डोळ्यांना चढली सुजन , 
परी अश्रूंचा पूर काही वधरला नाही ,
त्राण संपला तरी मी जागची हलली नाही ,
हो मी तेथेच आहे उभी ,
जेथे सख्या तू मला येण्याचे वचन दिले .

कुणा कुणाची दृष्ट झेलली ,
कशी मी सांगू तुला ,
मातीच्या गोळ्याची नकळत दगड झाली ,
अशी स्वताला हरवून बसली ,
हसणेही विसरली ,
तरीही तेथेच वसली मी ,
जेथे सख्या तू मला येण्याचे वचन दिले .

तुज सोबत घालवलेल्या क्षण क्षणाला आठवले ,
यातनांनी पिडीत झाले हृदय ,
तरी तुज्वरील विश्वासाला जगवले ,
काहीही झाले तरी तू येशीलच ,
या आशेने तेथेच आहे ,
जेथे सख्या तू मला येण्याचे वचन दिले .

कवयित्री - अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment