मैत्रीची ओळख


मैत्रीची ओळख 
मैत्री म्हणजे रक्ताचं नाही तर 
रक्ताच्या नात्यांनाही मागे टाकेल 
असं एक नातं असतं असं फक्त लोकमत वर्तमान पत्राच्या 'मैत्र' या पुरवणीत वाचत होते आणि अशातच तिची एंट्री माझ्या आयुष्यात झाली. अति कुरळ्या केसांची, गौर वर्णाची, थोडीशी ठेंगणी, किंचित लठ्ठ पण पाणीदार सुरमई डोळ्यांची, पापण्या जणू हातानं आकार दिलेल्या. हसमुख स्वभावाची ती बाबांची बदली झाल्यामुळे आमच्या वर्गात आली. पांढरा शर्ट आणि खाकी स्कर्ट असा आमचा शाळेचा गणवेश होता. तिचा शर्ट सर्व पोरींच्या शर्ट पेक्षा वेगळा होता. त्याला कॉलरला छान फ्रिल होती. शर्ट न म्हणता टॉप म्हटलं तरी चालेल. काही दिवसात आमची बोलता चालता ओळख झाली. तेव्हा समजलं आमच्यात खूप अंतर आहे. आर्थिक परिस्थितीच नाही पण अभ्यासात ही ती अव्वल होती. तिला डॉक्टर बनायचं होतं. मुली तिला घेरून  असायच्या. सर मॅडम तिची प्रशंसा करायचे. माझं तिच्याकडे आकर्षित होणं साहजिकच होतं. कारण तिच्याकडे ते सगळं होतं ज्याची मी स्वप्न पाहायची. शाळेत स्काऊट गाईड चा 2-3 दिवसांचा स्थायी कॅम्प होता. तेव्हा आम्हाला एकमेकींना जाणून घ्यायला छान वेळ मिळाला. सकाळी अंघोळीला आम्ही आपापल्या घरी जायचो. माझी आई नेमकी गावाला गेलेली. आता घरी जाऊन आंघोळ आटोपनं, मग खायला काही करणं. इतकं कधी करणार मी? या प्रश्नातच असतांना तिनी मला तिच्या घरी चल म्हटलं. आणि मी गेली. तिच्या आईनी आम्हाला गरम गरम नाश्ता करून खाऊ घातला. टिफिनही दिला सोबत. काकूसोबत आपलं मस्त जमलं. 
मग कळलं की ती तिच्या आधीच्या जिवा भावाच्या  मैत्रिणीला मिस करत होती आणि मी माझ्या आयुष्यात जिवा भावाची मैत्रिण कधी येईल याची वाट पाहत होती. माझ्यात जणू तिला तिची ती मैत्रीण दिसली होती की काय, काही दिवसातच आमची छान गट्टी झाली. नवीन वर्षाला तिनं मला एक ग्रीटिंग दिलं. बापरे ! भारी वाटलं मला. मैत्रिणीनं दिलेली पहिली भेट. मग आपणही काहीतरी द्यायलाच हवं. विकत घ्यायची सोय नाही. मी पत्रिकांचे ग्रीटिंग बनवून दिलं. मला वाटलं नव्हतं इतकं जास्त तिला ते ग्रीटिंग आवडलं. तिच्या निमित्ताने का होईना माझ्यातील एक एक कला बाहेर पडू लागली आणि मी जास्तीत जास्त स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूच तिला वाढदिवस, नवीन वर्ष, मैत्री दिवस, दिवाळीला (स्वतः पेंट केलेले दिवे ) भेट स्वरूपात दिले. आमचं एकमेकींच्या घरी जाणं वाढलं. तिचं टापटीप, सर्व वस्तूंनी  सुशोभित घर मला चैन पडू देईना. आपणही चांगला अभ्यास करू, नौकरी मिळवू आणि असं घर बनवू. असं मी ठरवलं. पण 
गणित माझ्या डोक्यात शिरेना. 
अन इंग्रजीत मन लागेना. 
बाकीच्या विषयांचं मला काही कळेना 
दहावीच्या टेस्ट पेपर मधले माझे मार्क पाहून, "दहावी नापास झाली तर लग्न लावुन देऊ" अशी धमकी घरून मिळाली. "छी लग्न ! नको मला माझं आयुष्य माझ्या टर्म्सवर जगायचं आहे. नवऱ्याच्या इशाऱ्यावर नाही." मन म्हणाले. मग काय काहीही करून पास व्हायचं ठरवलं. पण खरं सांगते कॉपी हा प्रकार मला कधीच जमला नाही. मग करा मेहनत. तेव्हा तिनी माझी खूप मदत केले. मला घरी बसवून माझ्याकडून अभ्यास करवून घेतला. आमच्या घरात एक दीड किलोमीटरचं अंतर असेल. ति मला घ्यायला तर यायचीच पण घरी सोडूनही द्यायची. जेवायची खायची कशाचीच चिंता नव्हती. माझं दुसरं घरच वाटायचं मला तिचं घर. आणि बॉर्डर वर का होईना मी दहावी पास झाली. तिनी सायंस घेतलं, मी आर्ट. 
इथून आमची फूट झाली. आता आम्ही एकमेकींना विसरून जाऊ अशीच सर्वांची समजूत झाली. पण तसं तर तिला जॉब लागल्यावरही झालं नाही. आम्ही एकमेकींना फोन करून बोलायचो. जमलंच तर भेटायचो. पहिल्यांदा स्मार्टकोन मी तिच्या सोबतच खाल्ला, हॉटेलिंग तिच्यासोबतच केली, शॉपिंग तिच्या सोबतच, मूवी थियेटर वारी तिच्यासोबतच झाली. आमच्या घरच्यांना आमची इतकी सवय झाली होती की आमच्यात काही बिनसलं तर टेन्शन त्यांना यायचं. आमच्यात जणू टेलीपथी चालायची. मला तिची आठवण आली की तीचा कॉल नाहीतर ती स्वतः आलीच समजायचं घरी. हेच तिच्या बाबतीतही घडायचं. जेव्हा ती इंजिनियरिंग झाल्यावर पहिल्यांदा पुण्याला गेली, तेव्हा तिच्या बाबांना तिची खूप काळजी वाटत होती. ते मला म्हणाले, "तुही जा सोबत." किती त्यांचा माझ्यावर विश्वास ! 
पण काळ पुढे सरकला तशा माझ्या थोडया insecurities वाढल्या. मला एका गोष्टीवर, एका धैयावर कॉन्सर्नट्रेशन करायला जमत नव्हतं. कधी हे कधी ते. एक ना धड भाराभर चिंध्या. तीही मला समजावून समजावून कंटाळली होती. ती तिच्या ऑफिस आणि वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाली.(प्रत्येकाला आपलं आयुष्य, त्यातील चॅलेंजेस आणि प्रायॉरीटीज असतात. याचा विसर मला पडला होता म्हणून की काय ) मला मात्र वाटायचं ती मला वेळ देत नाही, तिला तिचं ऑफिस, तिच्या नवीन मैत्रिणीच जास्त आवडतात, तिला माझी आठवण येत नाही, मी तिला गावंढळ वाटते, असं मला सारखं वाटायचं. याला कारण म्हणजे मला आयुष्यात इतकं महत्व, इतकं अटेंशन तिच्या आधी कोणी दिलंच नव्हतं. त्यामुळे माझं सगळं जग ति बनली होती. तिचा स्वभाव मात्र वाटेत भेटलेल्या प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारा. म्हणूनच सर्वांना ति हवीहवीशी वाटत होती आणि वाटतेही. मला जेव्हा हे सगळं कळून चुकलं तेव्हा थोडा उशीर झाला होता. पण इतका नाही की आमची मैत्री तुटेल. 
आयुष्यात खूप भूकंप आले, उलथा पाथल झाली. कडाडून भांडलो, एकमेकींचा राग राग केला, रडलो पडलो अन परत उठून उभ्या राहिलो. एकमेकींच्या पाठीशी पाठराखण म्हणून ! असो आम्ही आजही जीवश्च कंठश्च मैत्रिणी आहोत आणि नेहमीच राहू. अशा माझ्या प्रिय मैत्रिणीला, ऋचाला आज मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
तु आयुष्यात आलीस म्हणून मैत्री कळली 
अन पटरी वरून उतरलेली माझी गाडी रुळावर आली.😃
धन्यवाद !
©®Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts