तुटलेले धागे #प्रेमकविता

तुटलेले धागे 
ती : तुटलेल्या धाग्यांना, मला कधीच बांधावं वाटत नाही 
कारण बांधतांना पडलेल्या गाठी, 
सतत आठवण देतात कधीतरी तुटल्याची !

तो : माहितेय खूप छळतात त्या गाठी 
रस्त्यांवरच्या खाच खळग्यांसारख्या वाटतात त्या गाठी 
पण दिली संधी तर त्याच गाठी, 
शिकवण देतात, परत तीच चूक न करण्याची. 

ती : संधी ही एकदाच मिळते रे, 
तु नाही ऐकलंस का कधी? 
चूकभूल पदरात घालून माफ करण्या इतपत 
माझं मन मोठं नाही. 

तो : का लाजवतेस मला 
स्वतःला छोटं म्हणून !
अथांग सागरा सारखं मन तुझं, 
मला का माहित नाही. 
चल ना दोघंही पाऊल उचलू, 
एक पाऊल तु पुढे ये 
दोन पाऊल मी पुढे येतो.
अन नात्याला आपल्या, 
समजदारीचं वलय देऊ. 

ती : समजदारी दाखवावी, असं मलाही खूप वाटतं 
पण परत धागा तुटला जाणार नाही, 
याची हमी द्यायची कोणी, 
मला काही कळत नाही. 

तो : हमीचं काय, मीच देतो ना ती. 
ज्या छोट्याश्या इगो पायी तुटतो धागा, 
त्याला मी जवळपास भटकूच देणार नाही. 
आपल्या प्रेमाला परत ग्रहण मी लागू देणार नाही. 

ती : शब्द तुझे ऐकून, 
लख्ख प्रकाश पडल्या सारखं वाटतंय. 
ग्रहण जणू सुटलंय आताच, असं वाटतंय !

ती आणि तो (सोबत ) : 
तुटलेल्या धाग्यांना गाठी पडतांना, 
मनालाही गाठ पाडून घेऊ, 
नातं ताणून, धागा तुटेल त्या आधीच 
क्षणभर आपलं प्रेम आठवू !

तळटीप : काही दिवसांआधी माझ्या एका लेखिका / कवयित्री मैत्रिणीने, #वर्षाठुरकूल ने तुटलेल्या धाग्यांवर चार ओळी लिहिल्या होत्या. तेव्हा तिला प्रतिसाद म्हणून मी माझ्या कवितेच्या पहिल्या तीन ओळी लिहिल्या होत्या. ज्यावर मला खूप दादही मिळाली. पण कुठेतरी स्वभावा विरुद्ध लिहिल्या सारखं वाटलं. आणि लिहिता लिहिता मनातच या कवितेने जन्म घेतला. जी मी आज आपल्याला अर्पण करतेय. 
वाचा आणि नक्की सांगा कविता कशी वाटली ते.
फोटो साभार गुगल वरून !
धन्यवाद 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 
PGDCMH (post graduate diploma in counseling in mental health)
लेख आवडला म्हणून शेयर केला तर चालेल पण लेखिकेच्या नावासकट हा. 

Comments

Post a Comment

Popular Posts