Sunday, 25 December 2011

सरत्या वर्षाचे पडसाद ,' शेती '

खरच आहे वेळ जायला काहीच वेळ लागत नाही. आणि २०११ तर कसं आलं आणि कसं जातंय काहीच समजत नाहीय. फक्त सहा दिवस उरलेत हे वर्ष संपायला. म्हटलं
'सहा दिवसात सहा विषयांवर बोलू काही, लिहू काही;
सर्वांना आवडेल समजेल असं करू काही'
म्हणून सहा दिवसात एकेक विषय हातळण्याच ठरवलं. तर सुरुवात करतेय त्यापासून जो विषय जीवनावश्यक आहे आणि आपल्या मुलभूत गरजा भागवण्यात महत्वाची भूमिका पार पडतो तरीही वाडीत टाकल्यासारखा वागणूक झेलतो. तो विषय आहे,'शेती!'


बालपणी पुस्तकात वाचलं होतं 'शेती हा भारतीयांचा मुख्य व्यवसाय आहे. भारतातील ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. भारतीय शेतकरी हे जगातील सर्वात वैभवशाली शेतकरी म्हणून ओळखले जातात.' तेव्हा हि विधानं खरीहि वाटली होती. पण आज ज्या प्रकारे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, ते बघून वाटतं आतातरी भारताला शेतकऱ्यांचा देश म्हणणं सोडून द्यावं. आणखी किती दिवस आपण ह्या भ्रमात जगावं? ना आधी होत्या तशा उपजाऊ शेतजमिनी उरल्या ना तसे आपल्या धर्तीवर निष्ठा ठेवणारे शेतकरी. कितीतरी शेतकऱ्यांनी चांगला पैसा मिळतो म्हणून आपल्या जमिनी बिल्डर लोकांना विकल्या आणि मोकळे झाले एकदाचे. आणि बिल्डरांनी तेथे सिमेंट कोन्क्रिटची जंगलं उभारली. काही दिवसांनी पिकं कुठे घेतली जातील? कुठे शेती केली जाईल? बहुतेक मोठमोठ्या इमारतींच्या गच्चीवर [टेरेस] अंगणात, बगिचात नाहीतर क्रिकेट मैदानावर [ म्हणजे जेव्हा ती मैदानं तशीच पडून असतील क्रिकेटचा हंगाम संपल्यावर] ? देवाला माहित?[ किंवा सरकारला माहित?] त्यात आपली लोकसंख्या अजूनही वाढतच आहे. घरात खायला नसलं तरी चालेल पण दोन मुलं हवीच. अशी आपल्या देशवासीयांची मनोवृत्ती. प्रत्येक नवीन पिढीपरत जमिनीचे दोन-तीन भाग पडत राहिले तर कसे चालेल? नवीन यंत्र त्या छोट्या छोट्या तुकड्यांवर उपयोगी ठरत नाहीत. खरतर भारतात शेतकरी वर्ग हा सर्वात खालच्या दर्जाचा झालेला आहे आणि विदर्भात तर हि परिस्थिती अधिकच गंभीर रूप धारण करतेय.मला आठवतेय, २००७ साली श्री श्री रविशंकर ह्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे अन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या म्हणून एक शिबीर घेतले होते. मी सुध्दा त्या शिबिराचा एक भाग होते. तेव्हा भेट झालेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात सरळ पाहण्याची हिम्मत होत नव्हती. इतकं दुखं, खालीपणा, आपण काहीच न मिळवल्याची भावना वाचली होती त्यांच्या चेहऱ्यावर. लहान मुलांचे चेहरे ढम्म दिसत होते, भावरहित. २००७ ते २०११, तीन वर्ष गेली मधे. तरीही आजही शेतकऱ्यांची स्थिती जशी तेव्हा होती तशीच आताही आहे. फक्त वचन देणारे मंत्री तेवढे बदलले. आजही कधी पुरेसं पाणी पडत नाही म्हणून धान्य पिकात नाही. धान्य पिकलेच तर कधी ते मांडीत लवकर पोहोचत नाही. आणि जेव्हा पोहोचते तेव्हा गुणवत्ता घसरली म्हणून योग्य भाव मिळत नाही. माझे आजोबा शेतकरीच आहेत. ते सांगतात,''जेवढा पैसा शेतीला लावतो, तेवढाच पैसा पिकांची विक्री करून मिळाला ना तरीही धन्य वाटतं. अश्या स्थितीत नफ्याचा विचारही मनाला स्पर्शून जात नाही.''
''मग सोडून द्या शेती कारणं अन पडू द्या जमीन तशीच.''मी म्हटलं!
''अग पण कष्टांना घाबरून असं सर्वच शेतकऱ्यांनी शेती करणं सोडलं तर तू खाशील काय?'' असा सवाल करून आजोबांनी मला निरुत्तरित केलं.

No comments:

Post a Comment