मैत्र जीवांचे #friendshipdayspecial


मैत्र जीवांचं 
मी बालपणी खूपच लाजरी बुजरी आणि शांत स्वभावाची होती. घरची परिस्थिती हलाखीची त्यामुळे राहणीमानही अगदीच साधं. शरीर म्हणाल तर हाडांचा सापळा. हातपाय काळे कुट्ट. स्वतःच्या शरीराची काळजी घेणं म्हणजे काय हे तर कितीतरी दिवस गावीही नव्हतं आमच्या. आंघोळ झाली की हात पायाला पॅराशूट खोबऱ्याचं तेल चोपडायचं आणि चेहऱ्यावर थोडीशी पावडर लावली म्हणजे झालं. फेयर & लव्हली लावणं मी वयाच्या चौदा किंवा पंधराव्या वर्षी लसुरु केलं असेल. अशी आमची कथा. आजू बाजूच्या पोरींना गुलुगुलु बोलतांना पाहिलं की मला खूप वाटायचं की माझीही कोणीतरी जिवाभावाची मैत्रीण असावी. पण माझ्यात असा कोणताच गुणही नव्हता की ज्यामुळे कोणी माझ्याशी मैत्री करेल आणि अभ्यास म्हणाल तर तिथं आम्ही ढब्बू ! एखाद्या पोरी जवळ एखादी सुंदर वस्तू पाहिली की तिला हात लावुन पाहायची लालसा. ज्यामुळे समोरचीच्या नजरेत आम्ही हपापलेले आहोत हे दिसून येईल किंवा तिला वाटेल की माझी वाईट नजर आहे तिच्या वस्तूवर. एक असाच किस्सा माझ्या अजूनही लक्षात आहे. 
सातवी आठवीत असतांनाची गोष्ट, एक क्लासमेट चांदीची मोती जडलेली अंगठी घालून आली. मला ती जवळून बघायची इच्छा झाली. मी तिचा बोट पकडून त्या मोत्याला स्पर्श करून पाहिलं. क्लासमेटला वाटलं की मी अंगठी काढतेय की काय! ती काहीतरीच बोलली आणि माझा हात झटकन दूर केला. त्यादिवशी स्वतःच्या अशा वागण्याचा खूपच राग आला. तेव्हापासून कोणाच्या वस्तूला हात लावणं सहसा टाळतेच. (पण हो जेव्हा तुम्ही गरीब असता तेव्हाच तुम्हाला असा अनुभव येतो बरं का. श्रीमंत लोकांच्या हातात आपली किमती वस्तू द्यायला लोकं स्वतः तयार असतात.)
तर अशा तालामुळे माझी कितीही इच्छा असली तरीही  लवकर कोनाला माझ्याशी मैत्री करणं खूप अवघड जायचं. मग शाळेत आणि घराजवळही मीच आपली पोरींच्या घोळक्यात स्वतः समाविष्ट होऊन त्यांच्या मागं मागं फिरायची. जसं एखादं कुरूप, बिचारं, आपल्या परिवारापासून दूर झालेलं, स्वतःची किंमत न जाणणार हंसाचं पिल्लु बदकांच्या घोळक्या मागं चुपचाप चालायचं, या विचारानं की एक दिवस तरी ती बदकं त्याला आपल्यातील एक नक्की मानतील.
असो पण तेव्हा दोन मैत्रिणींनी मला खूप सहकार्य केलं. एक माझीच वर्ग मैत्रीण कल्पना सावरकर. दुसरी पासून चौथी पर्यंत आम्ही एकाच वर्गात होतो. साधी सरळ मुलगी. तिच्या सोबतचे दिवस सोनेरी होते. दुसरी प्रांजली, माझ्या शेजारच्या इमारतीत राहणारी. माझ्या पेक्षा एका वर्षानं लहान. सणवार, नवीन वर्ष आणि बरंच काही सगळ्यांनाच प्रांजली सोबत माझी तिच्या इमारतीत हजेरी लागायची. कधी वर्गणी दिली तर दिली नाहीतर कोणी मला मागतही नसे. पचून जायची मी त्यांच्यात. कल्पना आणि प्रांजली दोघीनींही खूप सांभाळून घेतलं त्या काळात मला. आज मैत्री दिनाला त्यांची आठवण काढली नाही तर मैत्री गाथाच अधुरी राहील माझी. 
पण माणूस जवळ असेपर्यंत जितका जास्त लक्षात असतो तितकाच दूर जाताच लवकर विसरला जातो. असंच काहीसं घडलं कल्पनाच्या बाबतीत. आठवतच नाही आम्ही कशा  आणि केव्हा वेगळ्या झालो ते. पुढे मी आठवीत गेली तेव्हा काही कारणानं आम्ही दुसऱ्या एरियात राहायला गेलो. आणि प्रांजली पण पडद्या आड झाली. कधी कधी भेट व्हायची शाळेत. पन आता गोष्टी खूप बदलल्या होत्या. माझ्यातही हळू हळू का होईना आत्मविश्वास जागृत होऊ लागला. 
सातवी पर्यंत पोरींच्या वर्गातच शिकलेल्या पोरी आम्ही. आठवी पासून पोरंही आमच्या वर्गात आली. वयात आलेल्या, येणाऱ्या पोरा पोरींचा एकच वर्ग अन मग काय बघावा ताल.🤦 शाळेतही काही मुली अगदी नटून थटून यायच्या. लीप बाम, कंगवा, पावडर बॅग मधेच असायचं. ब्रेक मध्ये हमखास टचअप ठरलेला. त्यांची ती तऱ्हा पाहुन मन स्वतः बद्दल अजूनच खजील व्हायचं. मला ते सगळं कधी जमलंच नाही अन म्हणून त्यांच्यातलं एक होता आलं नाही. पण आकर्षण खूप होतं. त्यांच्या सारखं आपणही राहायचं अन सगळ्यांनी आपल्याकडे वळून पाहावं असं जाम  वाटायचं तेव्हा. पण देवाने माझ्यासाठी काही वेगळंच चितलं  होतं. अन तिची एंट्री माझ्या आयुष्यात झाली. 
कोणाची? माझ्या पहिल्या वहिल्या जीवश्च कंठश्च मैत्रिणीची... 

Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts