माहेरपन

माहेरपन 
 राधिकाचे लग्न झाल्यावर पहिल्यांदाच तिची सासूबाई, मंदाबाई तिच्याकडे शहरात काही दिवस राहायला आली. मंदाबाई रोज राधिकाला काहीतरी नवीन खायला करायला लावायची. जे राधिकाला नाही जमलं ते स्वतः बनवून खायची. रात्री मनाला वाटेल तेव्हा पर्यंत टीव्ही पाहायची, कधी कधी टीव्ही सुरु ठेऊनच झोपी जायची. सकाळी कधी आठ वाजता तर कधी नऊ वाजता उठायची. राधिकाच्या साड्या घालून पाहायची. राधिकाला सासूबाईचे वागणं काही कळेना. रागही येई ! पण रवीनं, राधिकाच्या नवऱ्यान तिला आधीच सांगितलं होतं, "प्लीज आईला कशासाठीच टोकु नकोस. आठ दहा दिवस राहून ती परत गावाला जाईल. तेव्हा तिचं मन दुखणार असं बोलू नको हा." राधिकानेही मान हलवली. तेव्हा तिला वाटलं नव्हतं हे ध्यान असं इतकं येडं वागेल म्हणून. आठ दिवसात साजूक तुपाचा शिरा, तांदूळची खीर, बेसन लड्डू, बासुंदी, गुलाब जाम, इडली, डोसा, भजे वडे, आलू बोन्डे, पुरणपोळी, मटण, मासे सगळंच खाऊन झालं.
राधिकाला काही कळेना की ही बाई अशी आधाशासारखी किंवा जेलमधून सुटल्यागत का करतेय? घरी तर सगळंच ढणान आहे. जेठ जाऊ बाई आहेत. ते खाऊ नसतील देत का? 
रविवारी रवी, राधिका आणि मंदाबाईला, दोघींना शॉपिंगला घेऊन गेला. दोघींना साड्या घेऊन दिल्या. मंदाबाईने मनसोक्त खरेदी केली. सहा महिने टिकेल अशी शाम्पू बॉटल, फेस क्रीम, टूथब्रश, टूथपेस्ट, आंघोळीच साबण आणि केसांना लावायला सुवासिक तेल. तसेच बांगडया, पेटीकोट, चप्पल, कंगवा आणि बरंच काही खरेदी केलं. खास म्हणजे रवी सगळं विकत घेण्यासाठी त्याच्या आईसोबत, मंदाबाई सोबत फिरला. याचं राधिकाला आश्चर्य वाटलं. नाहीतर राधिका सोबत साधं मॉल मधे यायलाही तो कंटाळा करायचा. घरी परतल्यावर राधिकाने रवीला खूप झापलं. 
"अगं उद्या बाबा येत आहेत. एक दोन दिवसात जाईल ती. मग आपण नक्कीच जाऊ मॉल मध्ये तुझी शॉपिंग करायला."
"रवी प्रश्न त्यांच्या जाण्याचा नाही. प्रश्न हा आहे की तु 8 महिने झाले आपल्या लग्नाला. माझ्यासोबत कधीच असा फिरला नाहीस. मला एकटीलाच सगळी शॉपिंग करावी लागते."
"सॉरी रे ! पण समजून घे ना आईला नाही जमत ना असं एकटं फिरणं!"
"अच्छा, म्हणजे मला जमतं म्हणून मी एकटंच फिरायचं."
"अगं...."
"बस ! थकली मी. गुड नाईट." राधिका अंगावर घेऊन झोपून गेली. 
सासरे आले तशी मंदाबाईची तर्हाच बदलली. सकाळी सहालाच उठून आंघोळ देवपूजा करून सगळ्यांसाठी चहा बनवून देत. सासरे पाणी घ्यायलाही जागेवरून उठत नव्हते.  सासूबाई सगळं त्यांच्या हाती देई. एखाद्या दासी सारखी दिमतीला हजर असे. सासर्यांना राधिकाच्या हातच्या भाज्या फिकट  लागत म्हणून स्वतः स्वयंपाकाचा त्यांनी ताबा घेतला. दोन दिवसांनी सासरे जाऊ म्हणाले. रवीनं गावाची तिकीट काढली. 
जायच्या दिवशी मंदाबाईचे डोळे भरून आले. राधिकाला वाटलं काय झालं सासूबाईला. 
"माझं काही चुकलं का?" राधिकाने मंदाबाईला विचारलं. 
"नाई मा." राधिकाच्या तोंडावरून हात फिरवून मंदाबाई म्हणाली, "तुव काय चुकणार? तु त लय गुणाची पोर हाय. मायचं काई चुकलं असीन त माफ कर."
"रडू नका प्लीज! बसा बरं."
"हे आसू दुःखाचे नाई. आनंदाचे हाय बघ. आज दहा बारा वर्षानं माहेरी आली असं वाटलं मले. माया मायसोबत माय  माहेरही मेल होतं. भाउ साडी चोळी करतो दर दिवाळीले. पण आता आपल्या मनानं काई घेता नाई येत. जे देतात त्यात गोडी माना लागते. घरातल्या कोणत्या वस्तूले आता हात नाई लावता येत. कारण ते आता माया मायचं नाई वइनीच हाय बघ. जे शिजवतीन ते गप गुमान खावं लागतं. माय होती तवा चार दिवसात मी म्हणीन ते सारे करून खाऊ घाली. रात्री बारा वाजत तरी गप्पा मारत बसू आम्ही. सकाळी 8-9 वाजले तरी उठवत नव्हती. म्हणे, तुले काई पोरगी नाई, सुना कशा येतात कोण जाणे, म्या हाय तोवर भोग माहेर. लय खरं म्हटलं व्हतं तिनं. ती गेली अन दहा बारा वर्षानं तुया घरी माहेर भोगायला मिळालं. तुये उपकार मी कईच इसरनार नाई." मंदाबाईने राधिका समोर हात जोडले. राधिकाचे डोळे भरून आले होते. तिला तिच्या विचारांवर खूप राग आला. तिनं मंदाबाईला आपल्या दोन्ही हातानं आलिंगन दिलं. त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवत म्हणाली. 
"आजपासून मलाच तुमची पोरगी समजा आणि आमच्या घराला तुमचं माहेर."
एका माहेरवाशीनीची जशी पाठवण करतात तशीच हळद कुंकू लावून, साडी चोळीने ओटी भरून राधिकाने तिच्या सासूबाईची मंदाबाईची पाठवण केली.😊 हे सगळं पाहुन रवीला देव पावला असं वाटलं. 
समाप्त. 
माहेरची आस प्रत्येक वयाच्या स्त्री ला असते, पण म्हातारपणी माहेर गरज बनते. मग ती आई असो की सासूबाई त्यांना माहेरपण हवं असतं. 
तळ टीप : माणसं अमुक अमुक का वागतात? हे समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आयुष्य खूप सोपं होतं. प्रयत्न करून बघा😇😊.
माझं असंच नवीन लिखाण वाचण्यासाठी माझ्या वेबसाईटला लाईक, शेयर आणि sabskrib नक्की करा. 
फोटो साभार गुगल वरून !
धन्यवाद 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 
PGDCMH (post graduate diploma in counseling in mental health)
लेख आवडला म्हणून शेयर केला तर चालेल पण लेखिकेच्या नावासकट हा. 

Comments

Popular Posts