ओझं (भाग पहिला )

ओझं 
"काय गं ताई काय झालं? भाऊजींचा कॉल आला होता. तु आईकडे आली म्हणे रागा रागात, तेही दुध पित्या  मुलाला  सासू सासर्यांजवळ सोडून." मिताली तिच्या मोठया बहिणीला, हेमाला म्हणाली. 
"अगं मग काय करू? जेव्हा तेव्हा सासरे यांना म्हणतात, 'हिला सोडून दे . तुझं दुसरं लग्न करून देतो, तुला शेत जमीन नावावर करून देतो."
"अगं पण त्या बिचाऱ्या पोराला कशाला टाकून आलीस. काही झालं त्याला तर? तु घरी जा बरं. मी भाऊजींना सांगते तुला घ्यायला येतील ते."
"नको गं. तेही थकले आता. या कोरोना मुळे त्यांचं काम ठप्प झालंय. सुरुही होईल काही दिवसांनी परत. पण आता तुच सांग मिता, 3-3 लेकराचं इतक्या कमी मिळकतीत कसं भागणार? म्हणून घरी सासर्यांना म्हटलं आमचा हिस्सा आम्हाला द्या. तर म्हणतात आम्ही मेल्यावर तुमचंच आहे. आता का जमिनीसाठी यांच्या मरणाची वाट पाहु? त्यापेक्षा आता जिवंत असतांना दिलं नावावर करून तर किती बरं. आम्ही ते विकून एखादा छोटासा फ्लॅट घेऊ म्हणजे महिन्याचं भाडं तरी द्यावं नाही लागणार आणि त्या भाड्याच्या पैशात या 3-3 लेकराचंही करू शकू. तर अंगावर येतात माझ्या."
मितालीला काय बोलावं सुचेना. हेमाचे 'तीन तीन लेकरं', हे शब्द तिला आतून टोचत होते. हेमाचं मात्र तुनतुनं सुरूच होतं. "तुझंच बघ, तुला म्हटलं माझ्या एका पोरीला तुझ्याजवळ शाळेत टाक म्हटलं तर तू म्हणालीस की, तूझ्या एकाच पोराला खूप खर्च येतो. म्हणून माझ्या मुलीची जबाबदारी नाही घेऊ शकत तू. आमची तर 3-3 आहेत."  
मितालीला वाटलं सरळ विचारावं, "माझ्या भरवश्यावर मुलं होऊ दे म्हटलं होतं का मी? कोणी म्हटलं होतं, 3 लेकरं होऊ दे म्हणून?" पण तो विषय आता काढून काहीच फायदा नव्हता. हेमाची पहिली मुलगी 6-7 महिन्यांची असेल जेव्हा तिला दुसरं राहालं. तेव्हाच मिताली तिला म्हणाली होती, 
"गर्भपात कर, गर्भ निरोधक वापर आणि मुलगी 5-6 वर्षांची झाल्यावर दुसरं होऊ दे. आताच मूल होऊ देऊन स्वतःची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक फरफट काही करू नकोस."
पण पहिल्या मुलीच्या डोक्यावर शेंडी आहे म्हणजे तिच्या पाठीवर मुलगाच होईल, असं सासूबाईच निदान आणि हेमाला असलेली मुलाची हाव यामुळे मितालीचं हेमाने काहीच ऐकलं नाही. पण दुसरीही मुलगी झाली. असो झाली तर झाली काहीच वांदा नाही. शिकव त्यांना आणि मोठं कर. असं म्हणून मितालीनं हेमाला समजावलं. 2-3 वर्ष सगळं ठीक होतं. मितालीला वाटलं आता हेमा ऑपरेशनच करेल. पण झालं उलटंच. हेमानी तिसरं बाळ ठेवलं. लपून छपून गर्भलिंग परीक्षण केलं. मुलगी होती म्हणून ते पाडलं. परत दिवस गेले परत तेच केलं. आता मुलगा होता. दोन्हीही परीक्षणाला पन्नास हजारावर पैसे खर्च केले. 
मितालीला कळत नव्हतं, मुलाला जन्म देऊन असं काय मिळवलं बरं आपल्या बहिणीनं. घरात दोन पोरीचंच कसंतरी भागवल्या जाई. आता हे तिसरं. पण आता मितालीनं मधे काही न बोलायचंच ठरवलं. 
तिकडे हेमाला छोटया बहिणीचा, मितालीचा हेवा वाटे. एकच मुलगा अन सगळं नीट नेटकं होतं मितालीचं. लोकं म्हणायची, 
"पोराला एक बहीण होऊ दे."
पण ति फक्त हसून हो म्हणायची. करायची मात्र आपल्या मनाची. पुढे मुलगा तीन वर्षाचा झाल्यावर तिनं पार्ट टाईम शिकवणी घेणं सुरु केलं. तिच्या जीवनाला छान वळण लावलं. पण हेमाचं सगळंच गुंतलं. कोरोनामुळे नवऱ्याची कंपनी बंद झाली. ती तिच्या नवऱ्यासोबत गावाला आली. पण तीन लेकरांना खायला जास्त लागतं, मग घर खर्च कोण करणार, किराणा कोण आणणार? अशा छोटया छोटया गोष्टींवरून घरात आधी सासऱ्यात आणि नवऱ्यात भांडणं होऊ लागली. मग स्वयंपाक, धुणं भांडी, तीन तीन लेकरांना कोण पाहणार यावरून सासूबाई आणि हेमात भांडणं झाली. 
शेवटी वेगळं राहायचं ठरलं आणि हेमा व नवरोबाने शेत जमिनीतील त्याचा हिस्सा नावावर करून द्यावी ही रट लावली. जे हेमाचे सासरे करायला अजिबात तयार नव्हते. जसं समाजाला वाटतं नवरा बायकोचे ऐकून सगळं करतो, तसं सासर्यांनाही वाटलं अन ते म्हणाले, 
"या बाईला सोडून दिल्यावर देतो जमीन." 
मग काय, "सांभाळा तुमच्या नातवाला असं म्हणत." हेमा दुध पित्या दहा महिन्याच्या मुलाला टाकून माहेरी निघून गेली. ज्या मुलाला जन्म देण्यासाठी हेमाने इतक्या खस्ता खाल्या, तेच आज जणू तिला ओझं झालं होतं. पण आता पुढे काय? असं लेकराला सोडून चालणार का? मग जन्मच का दिला? या प्रश्नांनी मितालीला भांडावून सोडलं. 

Comments

Popular Posts