Thursday, 30 May 2013

यातना !


यातना ! हा शब्द जर आपल्या जीवनात नसता तर ? तर दुःख नसते . अन दुःख नसते तर ? तर चहूकडे सुखच सुख असते . हो असते सुख , पण त्या सुखाला काडीचेही मोल नसते . कारण
उन्हात तापल्यावर मिळणारी बाभुळाची सावली मोलाची ,
भुकेल्या पोटाला वाळलेली भाकर मोलाची ,
वाळवंटाच्या रेतीत काटेरी निवडुंग मोलाचा ,
तसेच यातनांच्या बाजारात दुखानंतरचे सुख मोलाचे ……….

हे सर्व आज लिहिण्याचे कारण असे कि , मला खूप वेळा प्रश्न पडायचा कि देवाच्या हाती जर सर्व काही आहे. तर मग तो देव आपल्या सर्वात सुंदर निर्मितीला म्हणजेच सृष्टीला सदैव आनंदी , त्याच्या सर्व भक्तांना सुखी का ठेवत नाही ? दुखाच्या मरण यातना सहन केल्यावरहि सुखाचे चारच क्षण का वाट्याला देतो ? ह्या मला पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आता मला मिळाले जेव्हा मी आई झाली . दिवसातून १५ - २० उलट्या होऊनही सर्व त्रास सहन करून नऊ महिने बाळाला आपल्या उदरात वाढवले . तरीही operation करून बाळाला बाहेर काढले आणि नॉर्मल delivery ने होणारा त्रास , तेव्हा सहन कराव्या लागणाऱ्या मरण यातना , त्या कळा मला सहन कराव्या लागल्या नाही म्हणून , असे वाटतच नाही कि खरच मी अथर्वला जन्म दिला म्हणून . कारण त्या यातनांचा आनंद मला मिळाला नाही . खरच खूप विचित्र आहेत ना माझे विचार . पण म्हणतात ना कि दुखा नंतर येणारे सुख खूप मोलाचे असते . तेच खरे . कारण माझी एक नॉर्मल delivery झालेली मैत्रीण मला म्हणाली होती ,''अर्चू बाळाच्या जन्मावेळी येणाऱ्या कळा खूप असहनीय असतात , असे वाटते कि आता मेलेले बरे पण एकदा का जन्मलेल्या बाळाचा चेहरा दिसला कि सर्व दुख , त्या कळा , ते मरणाचे भोग , सर्व मागे पडते आणि उरतो फक्त आनंद .'' खरेच बोलली होती ती . म्हणून तर बाळंतपनात खूप त्रास होणार आहे , हे माहित असूनही प्रत्येक स्त्रीला आई व्हावेसे वाटते . बहुतेक म्हणूनच सुख हे कधीच सदैव टिकून राहत नाही . ते येत जात राहते . त्यातही ते फक्त तेव्हाच येते जेव्हा त्याचे मोल हे अमोलनिय होते . जसे जेवण तर आपण रोजच करतो . पण ज्या क्षणी आपल्याला कडकडून भूक लागली असते, त्या क्षणी शिळ्या भाकरीचा मिळालेला एक तुकडाही पंच पक्वानापेक्षा चविष्ट लागतो .  बरोबर ना !

No comments:

Post a Comment